अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचे निष्ठावान कार्यकर्ते अॅड. राहुल झावरे यांच्या विरोधात आज पारनेर पोलिस ठाण्यात मिनीनाथ सूर्यभान बर्डे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा तहसीलदार ज्योती देवरे, भाजपचे नेते सुजित झावरे व मनसेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी राजकीय सूडबुद्धीने दाखल केलेला असल्याचा आरोप अॅड. राहुल झावरे यांनी केला आहे.
नेमके काय आहे प्रकरण ? जाणून घ्या सविस्तर
तासगावतील येडू माता मंदिर सभामंडपासाठी निधी मिळावा अशी मागणी मी वनकुटेचे सरपंच राहुल बबन झावरे यांच्याकडे केली होती. यावर राहुल झावरे म्हणाले मी दशक्रिया विधीसाठी येणार आहे.
तू तिथे ये. मी माझ्या बरोबर गावातील प्रल्हाद रामचंद्र पवार व नाथा गणपत बर्डे असे तिघे जण तेथे गेलो. त्यानंतर तेथे थोड्याच वेळात सरपंच राहुल झावरे आले.
दशक्रियेचा कार्यक्रम झाल्यावर तेथून लोक निघून गेले. त्यावेळी मी सरपंच झावरे यांना म्हणालो की, येडू माता मंदिराला सभा मंडप मंजूर झालेला आहे.
त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव करून द्या. त्यावर तो म्हणाला की, तुला काय करायचे ते कर तर तो म्हणाला तुला सांगितलेले कळत नाही का.
मी म्हणालो साहेब जातीवाचाक शिव्या देऊ नका. मी तुम्हाला वेडेवाकडे बोलत नाही. तरी देखील राहुल झावरे यांनी जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली,
असे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे पारनेर पोलीस ठाण्यात राहुल झावरे विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.