अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- एकमेकांवर प्रेम दर्शविण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना, सामाजिक उपक्रमाने दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करणार्या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनने आगळ्या वेगळ्या पध्दतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
वर्षभर सेवाप्रीत फाऊंडेशनशी सामाजिक कार्यासाठी जोडल्या गेलेल्या महिलांनी सामाजिक कार्यालाच प्रेमाचे प्रतिक मानून हा प्रेम दिवस साजरा करुन, वंचितांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा निर्धार व्यक्त केला. सावेडी येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सेवाप्रीतने वर्षभर राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचा आढावा घेण्यात आला.
व्हॅलेंटाईन डे दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सुशिला मोडक यांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, सविता चड्डा, डॉ.सिमरन वधवा, निशा धुप्पड, कशीश जग्गी, अर्चना खंडेलवाल, अन्नू थापर,
गीता नय्यर, अनुभा अॅबट, रितू वधवा, रुपा पंजाबी, गीता माळवदे या प्रमुख पदाधिकार्यांसह ग्रुपच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविकात सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सेवाप्रीतच्या सर्व महिला सदस्या वंचितांना वर्षभर सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रेम देत असतात.
सर्व महिला या ग्रुपच्या माध्यमातून जोडल्या गेल्या असून, हा ग्रुपच सर्वांचा प्रेमाचा प्रतिक बनला आहे. आपण ज्यांच्याशी प्रेम करतो ते व्हॅलेंटाईन असते. सर्व महिला सामाजिक कार्यासाठी सेवाप्रीतशी प्रेम करत असल्याने ग्रुपबरोबर प्रेमदिवस साजरा करण्यात आला असल्याचे स्पष्ट करुन,
त्यांनी सेवाप्रीतच्या वतीने गरजू व दिव्यांग विद्यार्थी, वंचित घटक, गरजू महिला यांच्यासाठी राबविलेले सामाजिक उपक्रम तसेच टाळेबंदीत महिलांनी मोठ्या धाडसाने घराबाहेर पडून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. सुशिला मोडक म्हणाल्या की, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून सामाजिक जबाबदारी पेळविणार्या महिलांचे कार्य कौतुकास्पद आहे.
प्रेमाचा दिवस सामाजिक संस्थेबरोबर साजरा करणे हा आगळा-वेगळा उपक्रम प्रेरणादायी आहे. अनेक महिलांनी क्रांती घडविल्याचा इतिहास असून,
महिला सामाजिक कार्यात सक्रीय झाल्यास परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. सिमरन वधवा यांनी महिलांसाठी मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा घेतल्या. विजेत्या महिलांना ग्रुपच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार्या महिलांनी एकत्र येत धमाल केली.