अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- देशातील ‘ओमायक्रॉन’ची रुग्णसंख्या शंभरावर पोहोचली असून केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबत खबरदारीचा इशारा दिला.(Omicron News)
गर्दी, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि नववर्ष स्वागत कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात कमी होत असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराने देशात एंट्री केली आहे.
आणि हळूहळू आता देशातील ११ राज्यांतील ओमायक्रॉनची संख्या शुक्रवारी १०१वर पोहचली आहे. त्यात ४० रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी ओमायक्रॉनचे नऊ रुग्ण आढळले.
त्यात पुणे जिल्ह्यातील सात रुग्णांचा समावेश आहे. सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील रुग्णांची संख्या आता १४ झाली आहे.
तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये १०, पुणे ग्रामीणमध्ये सात, पुणे शहर, कल्याण-डोंबिवली आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी दोन रुग्ण आहेत.
बुलढाणा, नागपूर, लातूर आणि वसई-विरार येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे. ओमायक्रॉन रुग्णांची दिल्लीतील संख्या २२, राजस्थान १७, कर्नाटक ८, तेलंगण ८, गुजरात ५, केरळ ५, आंध्र प्रदेश १, चंडीगढ १,
तमिळनाडू १ आणि पश्चिाम बंगालमध्ये १ एवढे असल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. युरोपसह जगाच्या अन्य भागांमध्येही या विषाणूचा फैलाव झपाट्याने होत आहे.
त्यामुळे लोकांनी अनावश्यक प्रवास, जाहीर तसेच गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. त्याचबरोबर नववर्षाचे स्वागत कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर साजरे करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.