अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये दणक्यात आगमन झालेल्या पावसाने सध्या दडी मारली आहे. गेल्या काही दिवसांपासून केवळ तुरळक सरी पडल्या आहेत. फारसा पाऊस झालेला नाही.
हेच चित्र पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यात पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत,
उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे पुणे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्चिम भागातील वार्यांची दिशा लक्षात घेता उत्तर पश्चिम भारत,
मध्य भारतात २४ ते २६ जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाच्यादृष्टीने अनुकूल स्थिती नाही. अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नाही, असं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे.
सॅटेलाईट आणि रडारच्या आधारे घेण्यात आलेल्या माहितीनुसार पालघर, डहाणू, शहापूर, मुरबाड, रोहा, रायगड,
अलिबाग, मोडकसागर, रत्नागिरी, दापोली, हरणाई, दक्षिण कोकणात पुढील तीन ते चार तासात पाऊस हजेरी लावेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.