अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- नगर जिल्हयात 30 मे 2021 पर्यंत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
दरम्यान जिल्हयात जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्या अनुषंगाने वाहणारा सोसाट्याचा वारा व पर्जन्यवृष्टी लक्षात घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
पावसात व सोसाट्याच्या वा-यात घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस व वारा थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. अतिवृष्टीच्या परिस्थितीत व सोसाट्याचा वारा वाहत असताना सुरक्षित ठिकाणी राहा व प्रवास करू नका.
पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जावू नये.
अतिवृष्टी व सोसाट्याचा वारा वाहत असताना कोणीही पर्यटन स्थळी, नदी-नाले इ. ठिकाणी जावू नये. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नजिकचे पोलीस स्टेशन,
तहसिल कार्यालय वा जिल्हा नियंत्रण कक्ष क्र.1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 ला संपर्क करावा. हवामान विभागाकडून, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करून जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.