ताज्या बातम्या

पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- राज्यात पुढील तीन दिवस सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कोकणं, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाबरोबर वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटरवर पोहोचण्याची अंदाज असून, १ आणि २ डिसेंबरला दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीजवळ, तर२ आणि ३ डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या समुद्रात मच्छीमारांनी जाऊ नये, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन राज्यातील कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रातही पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या काळात वाऱ्याचा वेगही वाढणार आहे. बुधवारी पावसाची व्याप्ती वाढणार असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा,

नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २ डिसेंबरला मुंबई पावसाची शक्यता नाही.

मात्र जवळच्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, नाशिक,

धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Ahmednagarlive24 Office