अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- सध्या कोरोना व्हायरसमध्ये बदल झाला असून त्याच्या संसर्गाचे प्रमाण वाढते असून कुटुंबाचे कुटुंब बाधित होत असल्याचे समोर येत असून त्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचे आकडे आता वाढण्यास सुरुवात झाली असून श्रीरामपूर तालुक्याची वाटचाल हॉटस्पॉटच्या दिशेने सुरू झाली. मध्यंतरी कोरोना रुग्णांची आकडेवारी एकदम कमी होती. आता मात्र वाढत चालली आहे.
यावेळी मात्र कुटुंबचे कुटुंब बाधित होत असल्याचे समोर आले. सध्या वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसने बदल केला.
त्यामुळेच बाधितांचे प्रमाण वाढते. जे लोक कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात येतात त्यांनी स्वतःला सात ते चौदा दिवस विलगीकरण केले पाहिजे, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यात शहरी भागात दोन, तर ग्रामीण भागात अकरा वैद्यकीय अधिकारी, तर एकूण २६ सहायक वैद्यकीय अधिकारी, तर शहरी भागात १०, तर ग्रामीण भागात ३४ परिचारिका आहेत.
शहरी भागात १७ व ग्रामीण भागात १४७ आशा सेविका कार्यरत आहेत. शहरी भागात १८ आशा सेविकांच्या, दोन परिचारिका, तर बेलापूर येथे एक आरोग्य अधिकाऱ्याची जागा रिक्त आहे.
कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे ट्रेसिंग करणे, बाधितांची संख्या वाढल्यास उपचार करणे ही कामे आता करावी लागणार आहेत.
त्यासाठी रिक्त जागा भराव्या लागणार आहेत. याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचेशी संपर्क साधला असता पुरेशा आशा सेविकांची मागणी केलेली असल्याचे सांगितले.