अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- मंत्रालयात ओळख असल्याने सांगून युवकाची तब्बल साडेअठरा लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली आहे.
मंत्रालयात ओळख असल्याने महसूल विभागाच्या राखीव कोट्यातून तलाठ्याची नोकरी लावून देतो, असे सांगत दोघांनी अकोले तालुक्यातील एका युवकाकडून साडेअठरा लाख रुपये घेऊन गंडवले आहे. या युवकाने पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी नितीन गंगाधर जोंधळे (रा. कोकणगाव, ता. संगमनेर) व विजयकुमार श्रीपती पाटील (रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेखर नंदू वाघमारे (३०, रा. अकोले) यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी त्याच्याकडून पैसे उकळले. पैसे मागायला गेल्यावर शिवीगाळ व धमकी दिल्याचाही आरोप आहे. फिर्यादीत वाघमारे यांनी म्हटले आहे की, नातेवाईकांच्या ओळखीने जोंधळे व पाटील आपल्या संपर्कात आले. यातील पाटील हे आपली मंत्रालयात आणि मंत्र्यांकडे ओळख असल्याचे सांगत होते.
या ओळखीतून अनेकांना नोकऱ्या लावून दिल्याचेही ते सांगत होते. वाघमारे यांना तलाठी पदावर नोकरी देऊ असे आश्वासन दिले. भरती नसली तरी महसूल विभागाच्या कोट्यातून नोकरी लागू शकते. त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले.
पाटील जे सांगत होते, त्याची जोंधळे यांनी हमी घेतली. शिवाय पाटील यांनी यापूर्वी नोकरी लावलेल्या काही उमेदवारांची नियुक्ती पत्रेही वाघमारे यांना दाखविली होती. त्यामुळे वाघमारे यांचा विश्वास बसला. त्यांनी जुलै २०२० ते १५ मार्च २०२१ या काळात जोंधळे व पाटील यांना वेळोवेळी पैसे दिले.
१४ लाख, ४५ हजार रोख दिले. तर ४ लाख, २ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने असे १८ लाख ४७ हजार रुपये दिले. पैसे देऊन बराच काळ झाला तरीही नोकरीचे पत्र मिळाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय वाघमारे यांना आला.
त्यांनी जोंधळे यांच्याशी संपर्क साधून नोकरी नसेल तर पैसे परत द्या, अशी मागणी केली. तर जोंधळे यांनीच वाघमारे यांना शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली.