अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-विनाअनुदानित धोरणाचा राज्यातील हजारो शिक्षकांना आर्थिक फटका बसत आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होते. परंतु, अद्यापही आजी-माजी राज्य सरकारने याची दखल घेतली नाही.
राज्यातील आजी-माजी सरकारांनी सातत्याने गाजर दाखविल्याचा आरोप करुन छात्रभारती संघटनेने आज संगमनेर प्रांत कार्यालयासमोर ‘गाजर दाखवा’ असे अभिनव आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.
दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शिक्षक विनाअनुदानित तत्त्वावर अध्यापनाचे काम करत आहे. मात्र राज्यातील शिक्षकांच्या मागण्या आजही प्रलंबितच आहे.
राज्य सरकार शिक्षकांच्या मागण्याला सातत्याने गाजर दाखवत असल्याचा आरोप करुन अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्याचे छात्रभारती संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
आता तरी लवकरात लवकर अनुदान द्यावे अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना प्रांताधिकार्यांकडून पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.