अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- मराठा आरक्षणासाठी सरकार तुमचे ऐकतेय, त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना केले आहे.
तसेच सारथी संस्थेला निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही. असे आश्वासन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत खासदार संभाजीराजे यांची मुंबईत बैठक झाली.
यावेळी सुमारे ३ तास चाललेल्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असून,
आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत असे सांगितले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सारथी संस्थेच्या योजनांसाठी निधीची कुठलीही अडचण येऊ देणार नाही.
सारथी संस्थेने गरीब, गरजू नागरिकांपर्यंत योजना पोचवून त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवावी. तसेच आरक्षणाच्या निकालामुळे विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठा समाजातील तरुणांना नियुक्ती देताना आर्थिक भार सोसण्यास शासन तयार असल्याचे ते म्हणाले.