अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- अहमदनगर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मास्क न वापरणाऱ्यांवर, तसेच गर्दी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपाने आता नटराज कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले आहे.
अहमदनगरमध्ये वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांसह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकार्यांबरोबर मुख्यमंत्री ऑनलाईन संवाद साधणार आहे. त्यामुळे या बैठकीमधील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
नगर शहरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. बाधितांची वाढती संख्या महापालिका प्रशासनासह प्रत्येकाचीच डोकेदुखी वाढवणारी ठरली आहे. प्रशासनाकडून वारंवार नियम पाळण्याचे आवाहन केले जात असताना अनेक बेजबाबदार नागरिक नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहे.
महानगरपालिकेकडे असलेले आनंद लाॅन, नटराज केंद्र, शासकीय तंत्रनिकेत, जैन पितळे वसतिगृह ही केंद्र नोव्हेंबरअखेर रुग्ण नसल्याने सॅनिटाईझ करून बंद करण्यात आली होती.
कोरोनाची संख्या जानेवारी ४०० पर्यंत कमी झाली होती. परंतु फेब्रुवारी महिन्यात पुन्हा संख्या झपाट्याने वाढून ९३८ झाली. तर मागील सहा दिवसांत ही संख्या आता ५०० वर पोहोचली आहे. रविवारी दिवसभरात नव्याने १५७ रूग्ण आढळून आले आहेत.
नगरच्या शेजारील औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे. औरंगाबाद आणि अहमदनगरमधील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येचा वेग पाहिल्यास बरीच सारखी आहे. त्यामुळे सायंकाळी होणार्या बैठकीकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे म्हणाले, “मुख्यमंत्री यांच्याशी आज सायंकाळी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकार्यांची बैठक आहे.
शहरासह जिल्ह्यात वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या बैठकीत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो”. कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्याचे आव्हान आरोग्ययंत्रणेसमोर आहे, असेही ते म्हणाले.