अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे न्यायदानाच्या क्षेत्रातील आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीतील कार्य सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांना निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, न्या. पी.बी. सावंत यांनी न्यायादानाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रतिमा उजळून टाकणारे कार्य केले आहे. गाढा अभ्यास आणि विविध विषयांतील प्रभुत्व यामुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या संस्था, आयोग, लवाद याठिकाणी काम करताना आपला असा ठसा उमटवला आहे.
निवृत्तीनंतरही त्यांनी समाज प्रबोधन आणि सामाजिक चळवळीत काम करताना मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली आहे. न्याय व विधी क्षेत्रात मोलाचे कार्य करतानाच त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीत निर्भीड आणि परखड विचारधारा कायम राहील यासाठी प्रयत्न केले.
त्यांच्या जाण्याने या दोन्ही क्षेत्रासाठींचे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील. माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.