अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसर्या वर्षीही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणार्या पायी दिंडी सोहळ्यावर निर्बंध आले आहेत. तर शाळा बंद असल्याने बालचमुंचा शहरातून टाळ-मृदूंगाच्या गजरात निघणारा दिंडी सोहळा होऊ शकलेला नाही.
मात्र रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत ऑनलाइन आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या वारीत वारकरी वेशातील गंधटीळा गळा माळ, हाती पताका खांदा पडशी व मुखी ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात अभंग भजन भक्तीगीते टाळमृदंगाच्या जयघोषात तल्लीन झालेले बाल वारकरी कोरोनाच्या काळात ही सुरक्षित वातावरणात आनंदाने आपल्या गुरूजनाच्या समवेत ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन माध्यमिकचे मुख्याध्यापक सुभाष ठुबे व प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके शाळेतील शिक्षिकांनी केले होते. सर्व पालकांनी बालकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा ऑनलाइन आनंद लुटला.
विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा व कोरोनापासून सुरक्षित राहण्याचा संदेश दिला. विद्यालयातील शिक्षकांनी भजन, भक्ती गीते, अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात केली. सानवी शेळके, स्वराज रोहोकले, श्रेयांश महामुनी, वैभवी सिनारे, अथर्व कोरके, विराज पांडुळे, तनवी आव्हाड, सार्थक चौरे, अनन्या मिसाळ या विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण केले.
घराघरात शालेय विद्यार्थी वारकरींची वेशभुषा परिधान करुन या कार्यक्रमात सहभागी झाले. समारंभास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे यांनी कोरोना काळात शिक्षणातील आध्यात्म व मानसिक स्थैर्य याबाबत संत विचार व भक्ती माणसाला समाधान देऊन तणावमुक्त करू शकते.
ही संतांची शिकवण बालमनावर बिंबवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यांनी आषाढी एकादशीचे आणि वारीचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य सुभाष ठुबे, मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी ऑनलाईन उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक सुजाता दोमल यांनी केले. टेक्नोसॅव्ही विभागाचे काम प्रदीप पालवे यांनी पाहिले. आभार उर्मिला साळुंके यांनी मानले. संमारभ यशस्वी करण्यासाठी इंदुमती दरेकर, मीनाक्षी खोडदे, शीतल रोहोकले, जयश्री खांदोडे, राहुल शिंदे यांनी परिश्रम घेतले.