अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-रूपयाला तीन जुड्या अशा मातीमोल भावात कोथिंबिरीची विक्री झाल्याने तालुक्यातील शेतकरी आपल्या डोळ्यांतील अश्रू लपवू शकले नाहीत.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर बुधवारी एक रूपयाला तीन जुड्या या बाजारभावात कोथिंबिरीची विक्री झाली.
मोठ्या कष्टाने तयार करून बाजारात आणलेल्या कोथिंबिरीला मिळालेला बाजारभाव पाहता शेतकऱ्याचा वाहतूक खर्च वसूल होणे मुश्किल झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑक्टोबर २०२० या लाॅकडाऊन काळात भाजीपाल्यांच्या बाजारभावाची झालेली वाताहत अजून थांबलेली नाही.
चार दिवसांपूर्वी कोबीला एक रूपया किलो बाजारभाव मिळाला. फ्लाॅवरची हीच परिस्थिती आहे.
आठवडे बाजारात शिल्लक भाजीपाला रस्त्यावर सोडून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाढती आवक बाजारभाव ढासळण्यास कारणीभूत असल्याचे आडत्यांचे म्हणणे आहे.