अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाने नाट्यगृह, चित्रपटगृृह उघडण्यासोबतच सांस्कृतिक क्षेत्राला मोकळीक देणारा शासन निर्णय जारी केला आहे.
मुंबईसह राज्यातील नाटय़गृहे, सिनेमागृहे आणि खुल्या प्रेक्षागारात पुन्हा एकदा हशा, शिट्टय़ा, टाळय़ांचा कडकडाट घुमणार आहे. 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत नाटय़गृहांची तिसरी घंटा वाजणार असून रंगदेवता आणि प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून रंगकर्मी नव्या जोमाने प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
तसेच राज्यात आता खुल्या आणि बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवनगी देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरपासून बंदिस्त, खुल्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार आहे.
खुल्या व बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी :-
– कार्यक्रमाला प्रवेश देताना प्रेक्षकांचे तापमान बंधनकारक.
– गर्दी नियंत्रणासाठी आयोजकांकडे सुरक्षा व्यवस्था असावी.
– कार्यक्रमाचे आयोजक, प्रेक्षक सर्वांना मास्क घालणे बंधनकारक.
– बालकलाकारांव्यतिरिक्त सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक.
– मोकळ्या जागेतील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास परवानगी नाही
– कार्यक्रमांच्या वेळी सर्व उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
– मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी दोन व्यक्तींमधील अंतर सहा फूट असावे.
नाटय़गृहांसाठी … :-
– कलाकार, कर्मचारीवृंद यांनी नियमितपणे कोरोना तपासणी करावी
– प्रेक्षकांचे थर्मल स्कॅनिंग करूनच प्रवेश
– मास्क, सॅनिटायजरचा वापर आवश्यक, प्रेक्षकांना कलाकारांना भेटता येणार नाही.
– अभिनेत्यांनी स्वतःची रंगभूषा स्वतःच करावी
सिनेमागृहांसाठी … :-
– दोन डोस घेतलेल्या प्रेक्षकांनाच प्रवेश
– प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.
– सिनेमागृहांमधील एअर कंडिशनचे तापमान 24 ते 30 सेल्सिअस इतके असावे.
– चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.