अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अपुऱ्या व अनियमित होणाऱ्या कोरोना लस पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून नागरिकांच्या रोषाला लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. संभाव्य तिसरी लाटेची शक्यता पाहता लसीकरण होणे गरजेचे आहे.
त्यासाठी जादा लसीचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. केंद्र सरकारने सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर नागरिकांमधून या घोषणेचे स्वागत झाले.
मागील आठवड्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. भल्या पहाटेच नागरिक लसीकरण केंद्रावर रांगा लावतात.
परंतु अपुऱ्या व अनियमित होणाऱ्या लस पुरवठ्यामुळे उपस्थित सर्वांनाच लस मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचा असंतोष वाढत असून लसीकरण केंद्रावर उत्साही तरुण गोंधळ घालत लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात.
तालुक्याच्या प्रमुख लसीकरण केंद्रावर अतिशय कमी लसीचे डोस उपलब्ध होत असून त्यामध्येही सातत्य नसल्याने व लस घेणाऱ्यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे गोंधळाची स्थिती आहे.
अशा परिस्थितीमुळे लसीकरण केंद्रावरील कर्मचारी व नागरीकांमध्ये वादावादी होत असून वशिलेबाजीचा व आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप तरुणांकडून होत आहे.
यामुळे लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत असून कर्मचाऱ्यांची मनस्थिती बिघडते.
संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे ते पाहता लसींचा जास्त पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.