अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- शहर असो वा गाव प्रत्यक्ष ठिकाणी अतिक्रमण व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यां याला सर्वसामान्य नागरिकाला सामोरे जावे लागत असते.
प्रशासन अशा बेशिस्तनवर आक्रमक कारवाई करत नसल्याने या समस्यां पुन्हा पुन्हा उद्भवत असतात. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कुचंबणा होत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत असते.
अस्तगावच्या बाजार पेठेत दुकाने पुढे आली, त्या दुकानांसमोर दुचाकी बिनधास्त उभ्या करून रहदारीस अडथळा निर्माण करण्याचे काम होत आहे. येथील बाजार तळावरुन गावात प्रवेश करण्यासाठी सकाळी 12 वाजेपर्यंत मोठी कसरत करावी लागते.
या दुकानांच्या पुढे मोठी जागा होती, परंतु दुकानदारांनी दुकानाच्या पुढे शेड उभे करायचे, त्या शेडला पुन्हा भिंती घालायच्या आणि पुढे पुढे सरकायचे हा प्रकार गेल्या 10 ते 15 वर्षांपासून सातत्याने सुरु आहे. अनेक दुकानदारांनी आपली दुकाने पुढे आणली आहेत.
दुकाने पुढे आणण्याची स्पर्धा सुरु आहे. प्रत्येक दुकानदार 10 ते 15 फुट पुढे अतिक्रमण करून पुढे आले आहेत. हे थांबविणार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. बाजार तळावरुन गावात प्रवेश करण्यासाठी मोकळ्या रस्त्याची गरज आहे.
दुकानांसमोर पांढरा पक्का पट्टा आखून रस्ता मोकळा करावा, यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
आजारी पेशंटला चार चाकीतून गावातील दवाखान्यात नेण्यासाठी ही या दुचाकीच्या पार्किंगचा मोठा अडथळा येतो. पुढे आलेली दुकानांचे अतिक्रमण आणि दुचाकींची पार्किंग यावर लक्ष देण्याची गरज आहे.