अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-एकीकडे नागरिक कोरोना सारख्या भयाण विषाणूशी लढत जगण्यासाठी प्रयत्न करत आहे.
तर दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल असे कृत्य केले जात असल्याचे उघड झाले आहे.
स्वस्त धान्य दुकानात मागील महिन्यापासून लाभार्थीना गहू देण्याऐवजी प्रति लाभार्थी दोन किलो मका दिली जात असून दिलेली मका ही खराब आणि किडकी आहे.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडतो आहे. असे असतानाही प्रशासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने आता नागरिकांचे आरोग्यच धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानात मका वाटप करण्यात येत असून किडलेली मका वाटप सुरू असल्याने लाभार्थी तक्रार करत आहेत. मात्र पुरवठा विभागाने आपले हात वर करत मागील महिन्यात चांगली मका दिली,
मात्र या वेळी जामखेड वरून आलेली मका ही खराब असल्याचे पुरवठा निरीक्षक पाचरणे यांनी सांगितले आहे. आता मका ही कुणी आहारात वापरत नाही. तरी ही मका लाभार्थ्यांच्या माथी मारली जात आहे.