नगर तालुक्यातील सारोळा कासार परिसरात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या पथकाने या परिसरात केलेल्या पाहणीत बिबट्याच्या पायाचे ठसे शेतात आढळून आले आहे. दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सारोळा कासार गावाजवळ सारोळा ते सुभाषवाडी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास गावातील बाळासाहेब लिंभोरे हे आपल्या कुटुंबियांसह कारमधून जात असताना त्यांच्या कारला बिबट्या आडवा गेल्याचे त्यांना दिसले.
त्यांनी ही बाब काही नागरिकांना सांगितली. त्यानंतर गाव परिसरातील नागरिक सतर्क झाले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.
वनविभागाने सारोळा कासारमध्ये पाहणी केली आहे. पाहणी दरम्यान शेतामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, तसेच महावितरण कंपनीने शेती पंपासाठी रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.