अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा सुरळीत झाला आहे.प्रत्येक गावागावात लसीकरण मोहीन हाती घेण्यात आली असून १८ वर्ष वयाच्या पुढील मतदार संघातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात आजपर्यंत १८ वर्ष वयाच्या पुढील ८००४६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून १,२०,००० नागरिकांचे लसीकरण होणे बाकी आहे.
कोपरगाव तालुक्याला कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा सुरळीत होत आहे. कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात लसीकरण सुरु आहे.आरोग्य विभागाकडून तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आले आहेत. कोपरगाव तालुक्यात वेळेत केलेल्या उपाय योजनांमुळे जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत परिस्थिती नियंत्रणात आहे.
मात्र श्रावण महिन्यापासून सुरु झालेल्या सण उत्सवांमुळे बाजार पेठेत गर्दी वाढत आहे. शासनाकडून लॉकडाऊनचे बहुतांश निर्बध शिथिल करण्यात आले असल्यामुळे हि गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण ठरू शकते.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी आजमितीला लसीकरण हाच एकमेव पर्याय संपूर्ण विश्वापुढे आहे. लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपात आपण सर्वांनी आपल्या नात्यातील आणेल जवळची माणसे गमविली आहेत.
यापुढील काळात अशी परिस्थिती निर्माण होणार नसली तरी कोरोना विषाणू बदलत असलेले नवनवीन रूप पाहता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
त्यासाठी ज्या १८ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण राहिले आहेत व ज्या ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे अशा मतदार संघातील सर्व नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन तातडीन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.