अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- नगर तालुक्यातील खोसपुरी येथे खानावळीच्या नावाखाली गावच्या परिसरात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री दुकानांविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ही दुकाने बंद पाडली.
पुन्हा दुकाने सुरु झाल्यास ग्रामस्थ थेट कायदा हातात घेवून ही दुकाने जेसीबी लावून पाडली जातील. असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
नगर तालुक्यातील सारोळा कासार – घोसपुरी रस्त्यावर घोसपुरी गावच्या शिवारात खानावळीच्या नावाखाली मोठ्य प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात असल्याने गावातील सामाजिक शांतता भंग पावते.
यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या दुकानात घुसून संबंधितांना दुकाने तातडीने बंद करण्यास बजावले. जर दुकाने सुरु ठेवल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा दिला.
सदर व्यवसायासंदर्भात यापूर्वीही पोलीस अधिक्षक कार्यालय व नगर तालुका पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले होते. तरीही हा व्यवसाय अद्यापपर्यंत बंद झालेला नाही.
उलट या व्यवसायामध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे गावामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि काही घटना घडून बरेच लोक जायबंदी आहेत.
तरी रस्त्यावर हा व्यवसाय खुलेआम केले जात असल्याने सारोळा कासार या गावामध्ये विद्यालयात व कॉलेजला जाणाऱ्या मुलींना मद्यपींकडून त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
त्याचसोबत आजुबाजूच्या नागरिकांना याचा त्रास होत होता. त्यामुळे नागरिकांनीच आक्रमक पवित्रा घेवून ही दुकाने बंद केली. तसेच परत जर दुकाने सुरू केली तर थेट जेसीबीने दुकाने उद्ध्वस्त करण्याचा इशाराच दिला आहे.