अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- खा. राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील कालच्या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी दिल्लीतूनच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची देखील उपस्थिती होती. आ.पटोले यांच्या या घोषणेचे शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आम्ही स्वागत करीत असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.
पटोले यांच्या स्वबळाच्या सततच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर आता हायकमांडच्या भेटीनंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याला दस्तुरखुद्द दिल्ली हायकमांडचाच पाठिंबा असल्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. सरकार आणि संघटना या दोन स्वतंत्र गोष्टी असून पक्ष वाढीसाठी काम करायचे स्वातंत्र्य प्रत्येक पक्षाला असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. त्यातच नगर मनपामध्ये काँग्रेस सत्तेत आहे की विरोधात, या विचारलेल्या प्रश्नाला महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी “माहिती घेऊन सांगतो” असे विधान नुकत्याच झालेल्या नगर दौऱ्यात केल्यामुळे जिल्हाध्यक्ष किरण काळे स्थानिक पातळीवर मनपातील सत्ताधार्यांच्या विरोधात घेत असलेल्या भूमिकेला नेतृत्वाची मूक संमती असल्याची चर्चा आहे.
यामुळे नागरी प्रश्नांवरून शहरात मनपा सत्ताधारी विरुद्ध शहर जिल्हा काँग्रेस असे चित्र रंगलेले पाहायला मिळत आहे. किरण काळे यांनी म्हटले आहे की, इथून मागच्या मनपा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहिलेली आहे. ज्या प्रभागांमध्ये काँग्रेसचा मतदार आहे त्याच प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचा देखील मतदार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा राष्ट्रवादीला कायमच फायदा झाला आहे.
मात्र यातून काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. दर वेळच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी म्हणून निवडून येऊ शकणार्या जवळपास सर्वच जागा या राष्ट्रवादी आपल्या पदरात पाडून घेते आणि इतर पक्षांचे प्राबल्य असणाऱ्या प्रभागांमध्ये काँग्रेससाठी जागा सोडल्या जातात.
यामुळे काँग्रेसच्या ताकदीचा उपयोग राष्ट्रवादीला झाला. मात्र राष्ट्रवादीचा काँग्रेसला कोणताही फायदा झाला नाही. उलटपक्षी काँग्रेसचे खच्चीकरण झाले असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळेच आमची मनपातील संख्या ही कमी राहिली, असा दावा किरण काळे यांनी केला आहे.
सध्याची शहरातील राजकीय परिस्थिती पाहता सर्वच पक्ष एकत्र आल्याचे चित्र जनतेला पाहायला मिळत आहे. मात्र काँग्रेस या सर्वपक्षीय सहमती एक्सप्रेसचा अजिबात भाग नसून नगर शहरातील जनसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत खऱ्या विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेसच वठवत असून आगामी अडीच वर्षांमध्ये नगरकरांच्या हिताच्या दृष्टीने काँग्रेस अधिक आक्रमकपणाने विरोधी बाकावरून काम करणार असल्याचा किरण काळे यांनी पुनरुच्चार केला आहे.
काळे यांनी म्हटले आहे की, आत्तापासूनच संभाव्य उमेदवारांना त्या-त्या प्रभागात ताकद देण्याचे काम काँग्रेसच्या वतीने केले जाईल. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू असून अजून अनेक चांगले आणि वजनदार चेहरे पक्षात येण्याच्या वाटेवर आहेत. ना. बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून योग्य वेळी त्यांनाही प्रवेश दिले जातील. काँग्रेसने शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून काढलेल्या आसूड मोर्चा नंतरच मनपा प्रशासनाला जाग आली असून डागडुजी सुरू झाली आहे. अनेक ज्वलंत प्रश्नांना आगामी काळात आक्रमकपणे वाचा फोडण्याचे काम काँग्रेस करेल, असे काळे यांनी म्हटले आहे.
निवडणुका जरी अजून लांब असल्या तरी देखील आगामी मनपा सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही संघटनात्मक बांधणीसाठी आत्ता पासूनच कंबर कसून कामाला लागलो आहोत. शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची स्वबळाची भावना ही ना.बाळासाहेब थोरात यांच्या समोर योग्य वेळी मांडली जाईल. शेवटी अंतिम निर्णय हा ना.थोरात यांचाच असेल, असे काळे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शहरात काळे यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना मरगळ झटकवून आगामी सार्वत्रिक मनपा निवडणुकीसाठी आत्तापासूनच कामाला लावण्याची व्यूहरचना शहर जिल्हा काँग्रेसने आखल्याचे पहायला मिळत आहे. गत निवडणूक काँग्रेस समवेत एकत्र लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या गोटात यामुळे नेमकी काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे