हुशार चोरटे… शटर फोडले… सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडले आणि 3 लाख लांबविले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- तंत्रज्ञानाच्या युगात जगात असताना प्रत्येकजण स्वतःला काळानुसार अपडेट करतो आहे. प्रत्येक गोष्टीत अद्यावतपणा येत आहे. यातच आता गुन्हेगारी देखील अपडेट होऊ लागली आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी चोरटे देखील हुशार झाले आहे.

नुकतेच कोल्हार भागवतीपूरमध्ये चोरट्यांनी येथील सुरेश रामनाथ निबे यांचे एमआरएफ टायर शोरूमचे शटर तोडून सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल चोरल्याची घटना घडली. सदर दुकानात सलग तिसर्‍या वेळेस चोरीची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, चोरट्यांनी सर्वप्रथम शोरूमच्या शटर खालील फरशी काढली. त्यानंतर शटर कटावणीच्या साहाय्याने उभे तोडले. चोरीपूर्वी येथील सीसीटीव्हीचे कनेक्शन आधी तोडून आपण कॅमेर्‍यात दिसणार नाही याची काळजी चोरट्यांनी घेतली.

त्यानंतर दुकानातील महागडे असलेले टायर टेम्पोत टाकून चोरटे पसार झाले. दरम्यान चोरीची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

मध्यरात्री सदर दुकानाचे चालक सुरेश आर निबे यांना घरून पोलिसांनी दुकानात आणल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले. लोणी पोलिसात 3 लाख 19 हजार रुपयांचा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी करीत आहेत.

सदर शोरूममध्ये सलग तिसर्‍या वेळी चोरीची घटना घडली आहे. मागील कुठल्याही चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही.

मात्र सध्या नियुक्त असलेले लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील व पीएसआय नानासाहेब यांनी अनेक गुन्ह्याची उकल अल्पावधीत केली असल्याने सदर चोरीचा तपास होऊन चोरटे गजाआड होतील असा आशावाद सदर दुकानाचे चालक सुरेश निबे यांनी केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24