अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बुरुडगाव येथील कचरा डेपो बंद करण्यात यावा. या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे
की, बुरुडगांव येथे मनपा शहराचा कचरा, घाण व इतर सर्व टाकावू पदार्थ टाकत असून, त्यास कायम बुरुडगावच्या नागरिकांचा विरोध होता व आहे.
त्यासाठी काही शेतकरी हरित लवादाकडे सुद्धा गेलेले आहेत. सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ असतांना ग्रामपंचायत प्रशासनाने काही अटी व शर्तीवर मनपास ना हरकत प्रमाणपत्र दिले होते.
परंतु मनपाने सदर अटी व शर्तीचे पालन केलेले नाही व संपूर्ण गावाचा विश्वासघात केला. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसभा घेवून या ना हरकत दाखल्यास विरोध केला आहे.
ना हरकत दाखला रद्द करण्याची सरदच्या ग्रामसभेत मागणी करण्यात आली. तसा ठराव पारित करण्यात आला. सदर कचरा डेपोमुळे बुरुडगाव ग्रामस्थांचे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे.
संपूर्ण परिसरातील पाणी दुषित झाले आहे. प्रदुषणामुळे शेतकरी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिक यांनी एकमताने मनपास दिलेल्या ना हरकत दाखल्यास विरोध केला आहे व संपूर्ण ठराव पारित केला
आहे. एकमताने मंजूर झालेला ठराव स्वीकारुन बुरुडगांव हद्दीतील कचरा डेपो कायमस्वरुपी बंद करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त यांना केली आहे. त्यानुसार मनपाने येथील कचरा डेपो तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.