अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- सोमवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील मढी – मायंबा डोंगरावर ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने या परीसरातील पवनागीरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून लागवड केलेला कांदा पुरात वाहून गेला.
सोमवारी रात्री सात वाजता सुरू झालेला पाऊस मंगळवारी नऊ वाजेपर्यंत कायम होता . रात्री एक वाजता पावसाने रौद्र रूप धारण केले . आणि अवघ्या पाच तासात मढी येथील गावचा पाझर तलाव भरला .
इतिहासात प्रथमच एवढ्या कमी वेळात तलाव भरल्याने ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले . मढीचा पाझर तलाव तुडुंब भरल्याने सर्वत्र महापुराचे स्वरूप आले.
मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक शेतक-यांचे शेतीचे बांध फोडून नदीचे पाणी थेट शेतात घुसल्याने शेतात ओहोळ (नाळ) पडून शेत भुईसपाट झाले तर काही शेतात वाहून आलेल्या मातीचे ढिगारे तयार झाले आहेत.
शेतकऱ्यांनी लावलेला कांदा मढी तलावात येऊन नदीतून वाहून गेले तर .शेतात उभे असलेल्या बाजरी, तुर ,उडीद , मुग , कपाशी मका या पिकात पाणी घुसल्याने पिक आडवे झाले आहे.
या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.अनेक विहीरी भरून वाहत आहेत . मढी येथील पाच किलोमीटरच्या परिसरात रस्त्यावर पाणी पाणी साचले आहे.
नदीकाठच्या शेतकऱ्यांचे लागवड झालेले कांदे मढी तलावात येऊन नदीतून पुरात वाहून गेले आहे . यामध्ये महागडे बियाणे, कांदा रोपवाटिकेचा खर्च व लागवडीच्या भरमसाठ मजुरीमुळे शेतकरी तोट्यात आला असून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रचंड नुकसान झाले आहे .