अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत १ जूननंतर टाळेबंदी निर्बंध सरसकट उठविण्याबाबत चर्चा झाली.
मात्र अजूनही २१ जिल्ह्यात रूग्ण सापडण्याचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी झाले नसल्याने तूर्तास याबाबत निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
याबाबत येत्या दोन दिवसांत टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही जिल्ह्यात निर्बंध शिथील करायचे किंवा नाही याबाबत निर्णय घेतील असे ते म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे,तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळेबंदी निर्बंध उठवण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले.
मात्र उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या सरसकट निर्बंध उठवणे योग्य होणार नसल्याचे मत मंत्रिमंडळाने व्यक्त केल्याचे ते म्हणाले. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की,
लसीकरणाबाबत अद्यापही जागतिक निविदांची छाननी सुरू असून त्याबाबतचा तपशील संकलीत केला जात आहे.
लसींच्या आयातीचे राष्ट्रीय धोरण नसल्याने फायझर, ऍस्ट्रजेनक किंवा स्फुटनिक सारख्या लसीचा पुरवठा करण्यात अडचणी कायम अहेत.
त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेवून लसी बाबत राष्ट्रीय आयात धोरण निश्चित करावे अशी विनंती केली जाणार आहे असे टोपे म्हणाले.
सध्या उपलब्ध लसीमध्ये दुसरा डोस देण्यास प्राधान्य देण्यात येणार असून लसीकरणात मागे राहिलेल्या जिल्ह्यांना सरासरी मध्ये येण्यासाठी लसी उपलब्ध करून देण्याबाबत आज निर्णय झाल्याचे ते म्हणाले.