अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
यातून आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले, असे ट्वीट भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केले आहे.
कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला १०० सदनिका हस्तांतरित करण्याच्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या वतीने घेण्यात आला होता.
मात्र निर्णय जाहीर झाल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसंच याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आला आहे.
यावरुन भाजपा प्रवक्ते भातखळकर यांनी टीका केली आहे.या निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार आहे असं म्हटलं आहे. तसंच आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.
कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी माणुसकीचा मात्र बळी दिला अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. भातखळकर यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे की, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या निवाऱ्यासाठी जवळच्या सुखकर्ता-विघ्नहर्ता
सोसायटीत काही घरे देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर केला होता. परंतु सहीच्या एका फटकाऱ्यासह मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द केला. माणुसकी खड्ड्यात. टाटा मेमोरियल रुग्णालयात देशभरातून रुग्ण येत असतात.
सोबतच त्यांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्ती येतात; परंतु त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने किंवा खासगी निवासस्थानाची सोय असलेले ठिकाण परवडत नसल्याने बरेचदा नातेवाईकांना पदपथावर राहावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होते.
ही गैरसोय टाळण्यासाठी परळ शिवडी विभागातील करीरोड येथील हाजी कासम चाळीच्या पुनर्विकासातून मिळालेल्या सदनिकांपैकी ३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रुग्णालयास नाममात्र दराने (१ रुपया प्रति वर्ष) देण्याचा निर्णय गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी घेतला होता.