अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील प्रमाणकांमध्ये (ट्रीगर) तातडीने बदल करावेत, या माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीची मुख्यमंर्त्यांनी दखल घेतली असून या योजनेतील जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने फळपीक उत्पादकांना दिलासा मिळून या योजनेत सहभाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने पुनर्रचीत हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू केली होती; मात्र योजनेतील निकष हे शेतकऱ्यांच्या नव्हे, तर कंपन्यांचे हीत जोपासणारे होते. ही गंभीर बाब आमदार विखे पाटील यांनी ९ मार्च २०२० रोजी मुख्यमंर्त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
मागील अर्थसंकल्पीय आधिवेशनातही या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवून नफेखोरी केलेल्या कंपन्यांवर टिकेची झोड उठविली होती. याबाबत राज्य सरकारने आमदार विखे पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन फळपीक विमा योजनेच्या निकषात बदल करुन, फळबाग उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. कोरोनाचे महासंकट अद्यापही दूर झालेले नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे फळपीकांची जोखीमही वाढली आहे. अशा सर्व बाबींचा विचार करता पुनर्रचीत हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये निश्चित केलेल्या प्रमाणकांचा फेरविचार करुन सुधारित निकष पुन्हा जाहीर करावेत,
अशी मागणी आमदार विखे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. फळपीक नुकसान संरक्षण कालावधीत भरपाई प्राप्त होण्यासाठी निश्चित केलेली प्रमाणके (ट्रीगर) हे वास्तव हवामान परिस्थितीच्या विपरीत होते.
ही बाब आमदार विखे पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. पूर्वी या योजनेसाठी पावसाचा निकष दोन दिवसांसाठी होता, शिवाय पावसाचा खंड हे प्रमाणक होते. शासनाने नव्याने लागू केलेल्या निकषांमध्ये जास्त पावसाचे निश्चित केलेले प्रमाणकच योजनेच्या लाभासाठी फळबाग उत्पादकांना अडचणीचे ठरणार होते.
शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून आमदार विखे पाटील यांनी या फळपीक योजनेच्या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या योजनेचे निकष बदलण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा तसेच नव्या निकषांप्रमाणे लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.