अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- झाड लावताना ते भविष्यात तोडावे लागणार नाही अशाच जागेत लावा. भिंतीच्या कडेला झाडे लावू नका, आपल्याला प्लास्टिक मुक्त व रोग मुक्त गावे करायची आहेत. बारीक गवताकडे लक्ष देवु नका.
मोठी झुडप, गाजर गवत, प्लास्टिक, पडकी घरे याकडे दुर्लक्ष करु नका. आपण खूप सुंदर काम कर त आहात, कितीजण आहात याचा विचार करु नका. कारण मूठभर माणसेच इतिहास घडवतात अशा प्रि तक्रिया देत आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील वीस गावाची आ.रोहित पवार यांच्या केजेडीएफ मार्फत समृध्द गाव योजनेसाठी निवड करून त्यांना विभागीय उपायुक्त सुरेश बेदमुथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू करण्यात आली आहेत.
आ.पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार या दररोज प्रत्येक गावाच्या प्रत्येक कामावर जातीने स्वत: लक्ष ठेऊन मार्गदर्शन करत या गावाच्या शाश्वत विकासासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
कर्जत तालुक्यातील एकूण ११ गावांनी श्रमदान करत स्वच्छता करण्याचे काम सुरू केले आहे. या कामात ग्रामस्थांबरोबर महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. या सर्वांचे सुनंदाताई पवार या मनोबल वाढवत आहेत.