अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यातील किराणा दुकानांमध्ये मालाचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी किरकोळ विक्रीच्या किराणा दुकानांसह ठोक विक्रेत्यासोबत
जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्यांना सोमवार ते शनिवारी यादरम्यान सकाळी 7 ते 11 या कालावधीत विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी रात्री काढले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची काल बैठक झाली.
यात याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे व्यापारी वर्गांसह शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील ठोक विक्रीची किराणा, भुसार दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तर ठोक विक्रीची किराणा, भुसार दुकाने शनिवार सकाळी 11 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डात फक्त भुसार मालाचे व्यवहार सोमवार ते शनिवार सुरू राहणार आहेत. तसेच मुख्य यार्डामध्ये फळे व भाजीपाला यांचे व्यवहारास बंदी राहणार आहे.
उपबाजार नेप्ती या ठिकाणी फळे, भाजीपाला व कांदा यांचे व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना सकाळी 7 ते 11 या कालावधीत शेत माल व्यवहार करण्यास परवानगी राहणार असून शनिवारी सकाळी 11 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत ते बंद राहणार आहेत