अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :-महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं कोरोना रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत.
यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. विदर्भातील आणखी एक जिल्हा कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. नागपूरनंतर नंदूरबारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. म्हणजे मागच्या दहा दिवसांत केवळ एका कोरोना रुग्णाची नोंद झालीय. त्यामुळे नंदूरबारकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.
नंदुरबार जिल्हा 11 ऑगस्ट रोजी कोरोना मुक्त झाला होता. त्यानंतर दहा दिवसांनी नंदुरबार जिल्ह्यात परत एक कोरोना रुग्ण आढळून आला असून तो नंदुरबार शहरातील आहे. गेल्या महिनाभरापासून नंदुरबार जिल्ह्यात तपासणीत पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येत होती.
त्यातून उपचार घेत असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर जिल्हा कोरोना मुक्त झाला होता. मात्र जिल्हा कोरोना मुक्त झाल्यानंतर दहा दिवसांनी नंदुरबार शहरातील श्रीजी पार्क भागातील एकाला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी,
अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनाने केले असले तरी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कोरोना नियमांचे पालन केल्यास जिल्हा पूर्ण मुक्त राहील. मात्र आठवडा बाजारातील गर्दी आणि कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.