अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे.
यातच अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा देखील केली आहे. यातच महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक माहिती समोर येत आहे.
देशात १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या आणि मोठ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी लसीकरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
नवाब मलिक यांनी म्हंटल आहे की, ‘महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील १८ वयोगटावरील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल.
सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल.’ तसेच, ‘जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे,’ असंही ते म्हणाले.
दरम्यान महाराष्ट्र राज्याबरोबरच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, केरळ, आसाम, झारखंड, गोवा, आणि सिक्कीममध्ये सर्व नागरिकांचे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे.