अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-कोरोनाचा कहर राज्यात अद्यापही सुरु असून राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातच आढळून येत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील ७२३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
नियमांचे काटेकोर पालन केल्याने या गावांमध्ये कोरोना हद्दपार झाला आहे. जिल्ह्यात एकूण १३१८ ग्रामपंचायती आहेत, तर १५९६ गावांची संख्या आहे.
१३१८ ग्रामपंचायतींपैकी ५६९ ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोना संपुष्टात आला आहे. गावांच्या संख्येचा विचार केला तर १५९६ गावांपैकी ७२३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. हे प्रमाण ४५ टक्के आहे.
जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांची संख्या :- शेवगाव-२८, पाथर्डी-४९, जामखेड-४२, कर्जत-७१, अकोले- १३७, संगमनेर-८१, कोपरगाव-४३, राहाता-२६, श्रीरामपूर-२७, राहुरी-४०, नेवासा-३२, श्रीगोंदा-५३, पारनेर-३३, नगर-६१
ही दोन तालुके हॉटस्पॉट :- सध्या पारनेर आणि संगमनेर ही दोन तालुके हॉटस्पॉट आहेत. या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी १२५ ते १५० रुग्ण रोज आढळून येत आहेत.
या दोन तालुक्यांत चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला आहे. एका तालुक्यात रोज पाचशे ते सातशे चाचण्या होत आहेत. या तालुक्यांमध्येही ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. याशिवाय शेवगाव, श्रीगोंदा या तालुक्यांमध्येही अधूनमधून रुग्णसंख्या वाढते.