अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :- कलाशिक्षकांच्या मागणीनंतर दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर चित्रकला परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा कला शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे यांनी दिली आहे.
यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन चित्रकला परीक्षा घेण्यात येतात.
महाराष्ट्र शासनाचे कला संचालनालय या परीक्षा आयोजित करते. करोना लॉकडाऊनच्या दोन वर्षात या परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे कला शिक्षकांकडून सातत्याने परीक्षा घेण्याची मागणी होत होती.
शासनाने 22 व 23 फेब्रुवारी रोजी फक्त दहावीच्या मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीने चित्रकला परीक्षेचे आयोजन केले होते. परंतु, चित्रकला हा प्रात्यक्षिक स्वरुपाचा विषय असल्याने ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेता येणार नाही
अशी भूमिका घेऊन जिल्हा कला शिक्षक संघाने सुरुवातीपासूनच निर्णयाला तीव्र विरोध केला होता. यातच दहावीची बोर्ड परीक्षा तोंडावर आली असल्याने विद्यार्थी त्या कामात व्यस्त आहेत.
त्यामुळे अभ्यासात व्यत्यय येईल या भीतीने हजारो विद्यार्थी या परीक्षेकडे पाठ फिरविण्याची शक्यता होती. यामुळे अनेक लेखी तक्रारी अनेक मुख्याध्यापकांनी व कलाशिक्षकांनी संघटनेकडे केल्या होत्या.
अखेर मंत्री महोदयांशी संवाद साधून ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पठाडे यांनी दिली. दहावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर एप्रिल महिन्यात चित्रकला परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम