Bhandardara Tourisum : सलग सुट्ट्यांमुळे भंडारदऱ्यात येताय ? हे महत्वाचे बदल लक्षात ठेवा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhandardara Tourisum : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत व सलग चार दिवस शासकीय सुट्टी आल्याने भंडारदरा पर्यटनस्थळावर होणारा गर्दीचा अंदाज बघून पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी एकेरी वाहतुकीचा आदेश काढला असून पर्यटकांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन राजूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे निसर्गाची अनोखी देणगी लागलेले पर्यटनस्थळ. त्यामुळे भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. भंडारदऱ्यास सलग चार दिवस सुट्टी आल्याने भंडारदऱ्याला पर्यटकांचा महापूर येण्याची शक्यता आहे.

त्यातच भंडारदरा परीसरातील अरुंद रस्ते असल्याने व अनेक ठिकाणी रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे वाहतुक कोंडी होण्याचा संभव आहे. म्हणून पोलिसांनी दि. १३ ते १६ ऑगस्टपर्यंत एकेरी वाहतुकीचा मार्ग अवलंबिला आहेत.

भंडारदऱ्याला येणारे पर्यटक संगमनेरकडून येताना अकोले- राजूर- रंधा- वाकी- हॉटेल यश- शेंडी- भंडारदरा गार्डन- धरणाचा सांडवा – भंडारदरा गाव- गुहीरे व रंधामार्गे परत जातील,

तर नाशिक- मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांनी वारंघुशी फाटा- हॉटेल यश- शेंडी- भंडारदरा गार्डन- धरणाचा सांडवा- भंडारदरा गाव- गुहिरे रंधा- वाकी व वारंघुशी फाटा असा प्रवास करत परतीचा प्रवास करावा.

भंडारदऱ्याच्या अभयारण्यात घाटघर फाट्यावरुनच प्रवेश मिळेल व रतनवाडी चेकपोस्टवर बाहेर पडावे, असेही सांगण्यात आले आहे. भंडारदऱ्याच्या पर्यटनाचा शांततेने आनंद लुटावा, असे आवाहन राजुरचे सहाय्यक निरीक्षक सचिन दात्रे यांनी केले आहे.

भंडारदरा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची तपासणी राजूर येथे पोलीस स्टेशनजवळ करण्यात येणार असून रंधा धबधबा, वाकी फाटा, वारंघुशी फाटा व घाटघर फाटा (शेंडी) येथेही वाहनांची तपासणी करण्यात येऊन मद्याचा साठा आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.