पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील नियोजित पुलाच्या कामास सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- दौंड मनमाड रेल्वे मार्गावर पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील नियोजित पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

अंदाजे 247 किलोमीटर लांबीच्या दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणास केंद्र सरकारने 2017 मध्ये मंजुरी दिली होती. या प्रकल्पासाठी एकूण खर्च अंदाजे 233 कोटी गृहीत धरलेला आहे.

जुना पूल ब्रिटीशांच्या कालावधीत पूर्ण झालेला असून त्याचे काम पूर्णपणे दगडात झालेले आहे. या पुलाला 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. दौंड मनमाड रेल्वेच्या दुपदरीकरणामुळे गोदावरी नदीवर दुसरा पूल अत्यंत गरजेचा असल्यामुळे पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.

सध्या नदीपात्र कोरडे असल्यामुळे पाया खोदण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे त्या जागेत अत्यंत टणक व कठीण दगड असून पायासाठी ही जागा उत्तम समजली जाते.

पायाची खोदाई झाल्यानंतर लगेचच लोखंडी पिलर उभे करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेले लोखंड व इतर साहित्यही जागेवर आणले आहेत.

दरम्यान या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी किमान 2 वर्षे लागतील, असा अंदाज हे काम करणार्‍या कारागिरांनी व्यक्त केला आहे.

पुलाच्या कामासाठी आवश्यक साधन सामुग्री तसेच काही यांत्रिक साधने आणलेली आहेत. पावसाळ्यात गोदावरी नदीला पाणी येण्यापूर्वी वेगाने काम सुरु ठेवण्यात येणार असल्याचे येथील कामगारांनी स्पष्ट केले आहे.