नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबध्द: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजावून घेणे आणि त्या सोडविण्याचा प्राधान्य देणे यासाठी आपण कटिबध्द आहोत, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

फळबाग विमा आणि पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणी संदर्भात कृषी अधिकारी आणि विमा कंपन्याचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हास्तरीय बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री तनपुरे यांनी शनिवारी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी शिराळ, चिचोंडी, वैजूबाभूळगाव, शिंगवे केशव आदी गावांना भेटी देऊन तेथील प्रश्न समजावून घेतले. यावेळी शिराळ येथे नागरिकांसमवेत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या या समस्यांचा पाठपुरावा करण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच यापुढील दौऱ्यात त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक झालेली असेल या पद्धतीने कार्यवाही करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

कृषी विभागामार्फत उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान मोहीम २०२१-२२ या अंतर्गत गावातील दोन लाभार्थी शेतकऱ्यांना दोन ट्रॅक्टरचे वितरण यावेळी करण्यात आले. तसेच रोटाव्हेटरचे देखील वाटप राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

वैजुबाभूळगाव येथेही राज्यमंत्री तनपुरे यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी गावच्या वीज, पाणी आणि रस्त्याबाबतचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. त्यावेळी त्यांनी राज्य शासनाने आणलेल्या नवीन कृषी उर्जा धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.

यामुळे गावातील विजेची थकबाकी भरली गेली तर त्यातील ३३ टक्के रक्कम गावासाठीच विजेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वांबोरी चारीच्या टप्पा क्रमांक २ मध्ये १४ गावांना दुसऱ्या टप्प्यात पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वैजुबाभूळ येथील रस्त्याचे डांबरीकरण, पाझर तलाव दुरुस्ती, एमएसइबी पोलची देखभाल आदीबाबत तत्काळ कार्यवाहीचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. गावातील काही महिलांनी विशेष सहाय्य योजनेचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर राज्यमंत्री तनपुरे यांनी तत्काळ तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना निराधार महिलांना अंत्योदय व प्राधान्य योजनेनुसार तात्काळ अन्नधान्य द्यावे अशा सूचना दिल्या.

राज्यमंत्री तनपुरे आज पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना शिराळ, चिचोंडी, वैजूबाभूळगाव आणि परिसरातील दुःखी परिवारांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. काळ अवघड आहे मात्र एकमेकांच्या साथीने हे दुःख बाजूला सारून नव्याने सुरुवात करूयात असा विश्वास त्यांनी या कुटुंबियांना दिला आणि काळजी घेण्यास सांगितले शिंगवे केशव येथे सहामोरे डीपी क्र.३ चे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.

आता या परिसरातील विजेची समस्या बऱ्याच प्रमाणात सुरळीत होणार असून शेती आधारित कामे मार्गी लागतील,

अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विकास कामे होत असताना नागरिकांनीही ती दर्जेदार होतील यासाठी सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे, असे सांगितले. या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, संबंधित गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24