अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसांत नुकसान भरपाई न मिळाल्यास दि.९ मार्च रोजी गोळेगाव, शेकटे खु. नागलवाडीसह तालुक्यातील अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसह कोविड-१९ चे नियम पाळून ग्रामविकासमंत्री यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे यांनी दिला आहे.
याबाबत आंधळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अहमनगर येथे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान शेवगाव तालुक्यातील पिकांचे झाले आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ज़मा करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, अद्यापही तालुक्यातील ४० पेक्षा ज़ास्त गावांतील शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ५२ गावांना अनुदान प्राप्त झाले असून, उर्वरित गावांसाठी अनुदानाची रक्कम २०-२१ जानेवारीला तालुका प्रशासनाकडे प्राप्त झाली असून, प्रशासनाने अद्याप या अनुदानाचे वाटप न करता शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.
येत्या आठ दिवसांत नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा न झाल्यास दि. ९ मार्च रोजी गोळेगाव, शेकटे खु. नागलवाडीसह तालुक्यातील अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसह आपल्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.