अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- मौजे केकती शहापूर, बाराबाबळी, वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका मागे घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी पोलिसांच्या ऑनलाईन संकेतस्थळावर धमकावणार्या व्यक्ती विरोधात तक्रार नोंदवली आहे.
तर धमिकी देणार्यावर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रार अर्जात भिंगारदिवे यांनी म्हंटले आहे की, मौजे केकती शहापूर, बाराबाबळी, वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीतील काही बांधकाम व्यावसायिकांनी अनाधिकृतपणे ग्रामपंचायतकडून बांधकाम ना हरकत प्रमाणपत्र न घेता ग्रामपंचायतींचे बनावट सही, शिक्के बनवून बांधकाम केले आहे.
त्याबाबत गेल्या दोन वर्षापूर्वी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी भिंगार येथील सर्कल यांच्याकडे सर्व दस्तऐवज घेऊन गेलो असता, त्यांनी काही ऐकून न घेता बांधकाम व्यवसायिक यांची बाजू घेतल्याने त्यांची व माझी बाचाबाची झाली. त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत कार्यालयांमधून हाकलून दिले. त्याबाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता.
सर्कल धनदांडगे असल्याने त्यांनी पुढील कोर्टात ब समरीमध्ये सदर गुन्हा निकाली काढला. परंतु मी हायकोर्टात या विरोधात अपील दाखल केले, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये सर्कले यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होता. यामध्ये माझ्या विरोधात सुदाम गांधले यांनी खोटी साक्ष दिली. या प्रकरणात त्यांनी मला सातत्याने मानसिक त्रास दिला आहे.
त्याने बांधकाम व्यवसायिक यांच्यामार्फत भरपूर वेळा जनहित याचिका मागे घेण्यासाठी पैश्याचे आमिष दाखवले. पैसे घेण्यास नकार दिल्याने याचा राग काढण्यासाठी त्याने माझ्या विरोधात खोटी साक्ष दिली असल्याचा आरोप भिंगारदिवे यांनी केला आहे.
काही दिवसापासून गांधले यांनी पुन्हा धमकाविण्याचे सत्र सुरु केले आहे. सदर प्रकरण तडजोड करुन मागे घे, अन्यथा जिवे मारु अशा धमक्या दिल्या जात आहे.
गांधले, बांधकाम व्यावसायिक व सर्कल यांच्याकडून माझ्या व सर्व कुटुंबाला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे भिंगारदिवे यांनी तक्रार अर्जात म्हंटले असून, संबंधीतांवर योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.