अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- मुलाचे अपहरण केल्याच्या फिर्यादीची सखोल तपास चौकशी करत असताना जामखेड पोलिसांसमोर वेगळाच प्रकार आला. हा प्रकार अपहरणाचा नसून आर्थिक व्यवहारावरून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
यावरून शोभा सवई राठोड (वय ५५ वर्षे, रा.धनगरवाडी, ता.दारव्हा, जिल्हा यवतमाळ) या महिलेच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला म्हणून जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की,
शोभा सवई राठोड या महिलेने दि. १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जामखेड तालुक्यातील मोहा येथे श्रीपाल भारत वसेकर (रा.टाकळी सिकंदर ता.मोहळ जिल्हा सोलापूर) वगैरेंनी संगनमत करून माझा मुलगा प्रेम सवाई राठोड यास काळ्या रंगाच्या सफारी गाडीतून पळवून नेले अशी फिर्याद दिली होती.
याबाबत जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने पोलिस पथक सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथे रवाना केले. त्यानुसार या पथकाने कसून शोध घेतला व वरील लोकांना ताब्यात घेतले. या सर्वांची चौकशी दरम्यान मात्र वेगळाच प्रकार समोर आला.
तो असा की, शोभा राठोड व तीचा मुलगा प्रेम राठोड यांनी आम्ही तुम्हाला ऊस तोडणीसाठी मजूरांची टोळी देतो, असे सांगून श्रीपाल वसेकर यांच्याकडून २ लाख रुपयांची उचल घेतली होती. त्यातून आणखी व्यवहार होऊन प्रेम राठोड हा दारव्हा येथून मोहा येथे उसतोडीसाठी आला होता.
परंतु शोभा राठोड या महिलेने अपहरणाचा गुन्हा घडलेला नसताना अर्थिक व्यवहाराच्या रागातून व सुडबुद्धीने खोट्या स्वरूपाची तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले. यावरून शोभा राठोड हिच्या विरोधात जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.