अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- पुराचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. पुढील तीन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर २९ जुलैला या भागात अतिशय जोरदार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत पावसाने थैमान घातले होते.
यामुळे रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यात नद्यांना पूर आला. यामुळे काही जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली.
महाराष्ट्रात एनडीआरएफसह राज्यतील यंत्रणांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. महाराष्ट्रात रायगडच्या महाडमधील तळीये गावात सोमवारी ढिगाऱ्याखालून आणखी ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले.
आता राज्यातील मृतांची एकूण संख्याही वाढून १६४ इतकी झाली आहे. वर्धा आणि अकोल्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही १०० जण बेपत्ता असल्याचं सरकारने म्हटलं आहे.
पुढील ३ ते ४ दिवसांत उत्तर आणि पूर्वी भारतात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुराचा सामना करत असललेल्या महाराष्ट्रातही पुढील तीन दिवस पावसाचाअंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य प्रदेशात उत्तर-पश्चिमेत बनलेला कमी दाबाचे क्षेत्र आता कमी झाले आहे. पण अजूनही या भागावर चक्रवात कायम आहे.
उत्तर बंगालच्या खाडीवर आणखी एक चक्रवाताचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा परिणामामुळे उत्तर बंगालची खाडी आणि त्याच्या आजूबाजूला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.