अधिवेशनात गोंधळ म्हणजे रणनीती नव्हे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-गोंधळ म्हणजे रणनीती नाही. अधिवेशन चालू न देणे याला रणनीती म्हणणार का? अशी रणनीती समोरूनदेखील होऊ शकते; पण दोन दिवसाचे अधिवेशन गोंधळात वाहू देणार का?, असा सवाल करीत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना फटाकरले आहे.

विरोधकांना सुनावले खडे बोल :- राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधक गोंधळ घालण्याची चिन्हे आहेत. त्यावरून राऊत यांनी विरोधकांना फटकारले आहे. गोंधळ म्हणजे रणनीती नाही. त्यामुळे अधिवेशन गोंधळात वाहून जाऊ देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांना खडेबोल सुनावले.

चर्चेसाठी अनेक प्रश्न :- राज्यापुढे अनेक प्रश्न आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यावर चर्चा होऊ शकते. कोरोनावर चर्चा होऊ शकते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, असंही ते म्हणाले.

दोन दिवस पूर्णवेळ अधिवेशन चालू द्या :- शिवसेनेचे किंवा सरकारचे अनेक मुद्दे असू शकतात. ते राज्याच्या हिताचे असू शकतात. त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. कायदे होणे गरजेचे आहेत. ठराव मंजूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी विरोधी पक्षाने विधिमंडळाचे कामकाज पूर्ण वेळ चालू देणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष स्वतःला महाराष्ट्राचे समजत असतील, त्यांना महाराष्ट्राचे हीत व्हावे असे वाटत असेल, तर त्यांनी दोन दिवस पूर्ण वेळ अधिवेशन चालू द्यावे, असं आवाहनही त्यांनी केलं.

गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी :- कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यासंदर्भात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात मी काम करतोय. त्यामुळे मला माहीत आहे, तिथे काय चालतं, असं त्यांनी सांगितलं.

 

 

अहमदनगर लाईव्ह 24