लसीकरणाचा गोंधळ… खासदार सुजय विखेंनी अधिकाऱ्यांना दिल्या या महत्वपूर्ण सूचना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- ग्रामीणसह शहरी भागात लसीकरणात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांना अडचणी येतात. लसीकरणाबाबत अनेक तक्रारी येत असून, काही ठिकाणी गोंधळ होत आहे.

करोना लसीकरणाच्यावेळी उडणार्‍या गोंधळात सुसूत्रता येण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात समान लसीकरणाचे नियोजन करा. यातून सर्व गावांना न्याय मिळेल.

अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे यांनी आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या.खा. डॉ. विखे यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यात पंतप्रधान आवास योजना, तसेच करोना लसीकरणाचा आढावा घेतला. विखे यांनी लसीकरणात येणार्‍या अडचणींवर वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली.

अनेक गावांत अजून लस पोहोचलेली नाही. सध्या प्राथमिक उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावांत उपलब्ध लसीप्रमाणे क्रमाने लसीकरण सुरू आहे. परंतु यातून अनेक जण वंचित राहत आहेत. त्यामुळे गावांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आलेली लस विभागून द्या. म्हणजे मोठ्या लोकसंख्येच्या गावात आवश्यक लस पोहोच होईल.

तसेच लहान लोकसंख्येचेही गाव त्यात समाविष्ट होईल. ग्रामीण भागात लसीकरणाचे जसे गावनिहाय नियोजन आहे, तसेच नगरपालिका किंवा महापालिका क्षेत्रात एकाच केंद्रावर लस देण्यापेक्षा वॉर्डनिहाय नियोजन केल्यास सर्वांपर्यंत लस पोहोचेल.

याशिवाय नगरपालिकेच्या ठिकाणी असणार्‍या ग्रामीण रुग्णालयात केवळ नगरपालिका हद्दीतील लोकांना लस द्यावी, अशा सूचना खा. विखे यांनी दिल्या.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24