अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे कोरोना लसीकरण केंद्रावर २०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते.त्यामुळे १८ वर्षापुढील नागरिकांनी पहाटे ५ वाजेपासून नंबर लावण्यास सुरवात केली होती.
मात्र प्रत्यक्ष लसीकरणावेळी गावातील काहींनी वशिलेबाजी सुरू केल्याने लसीकरण केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता.
येथील लसीकरण केंद्रावर सकाळी ९ वाजेपर्यंत ७०० ते ८०० नागरिक लसीकरणासाठी येऊन थांबलेले असताना आरोग्य केंद्रवरून लस येताच गावातील काही प्रतिष्ठित आणि मोठ्या लोकांनी वशिलेबाजी करून लसीकरण करून घेण्याचा प्रकार सुरू झाला.
त्यामुळे पहाटेपासून लसीकरणासाठी नंबर लावून बसलेल्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली अन लसीकरण केंद्रावर गोंधळ झाला.
नागरिकांमध्ये चिडचिड होऊन धक्काबुक्की होण्यास सुरवात झाली.त्यानंतर पोलिस प्रशासनाला कळवण्यात आले.
पोलिस प्रशासन आल्यानंतर पहाटेपासून जसे नंबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने लिहून घेतले त्याप्रमाणे लसीकरण शांततेत करण्यात आले.