अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- महाविकास आघाडीमध्ये समान किमान कार्यक्रमानुसार विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसकडे निश्चित करण्यात आलेले असताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे.
तरी भास्कर जाधव यांनी केलेले वक्तव्य हे व्यक्तीगत असून त्याला विशेष महत्व नाही, काँग्रेसकडे देखील असे भास्कर जाधव आहेत. अशी खोचक प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी भास्कर जाधवांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचाले असता त्यांनी अत्यंत मोजक्या मात्र तितक्याच खोचक शब्दांत आपली प्रतिक्रीया दिली. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून केंद्रावर चांगलेच टिकास्त्र सोडले ते म्हणाले की,
केंद्र सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार करताना यावेळी सहकार मंत्रालयाचा समावेश केला आहे. मात्र हे मंत्रालय नेमकं का सुरू केले याचा नेमका हेतू काय आहे हे आम्हाला अद्यापही समजले नाही.
सहकारामध्ये इतर विभागांचा हस्तक्षेप हा सहकाराचा आत्मा नष्ट करणारा करतो. सहकार मंत्रालयाचा उपयोग सहकार बळकट करण्यासाठी व्हावा.तर मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे योग्य निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्यांचे राज्यात देशात कौतुक केले जात असल्याचे देखील ना.थोरात म्हणाले.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लोकल सुरू करणे गरजेचे असते तरी लोकल सुरू केली तर गर्दी वाढेल परिणामी कोरोना वाढण्याची भीती आहे.
त्यामुळे यामध्ये सुवर्णमध्य काढणे महत्वाचे असून मुख्यमंत्री निर्णय घेतील. तो निर्णय कटू जरी असला तरी योग्य असेल असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.