अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- किरण काळे यावेळी म्हणाले की, शहरामध्ये सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. अशात गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणीसाठी खड्डे घेतील.
त्या संदर्भात मनपाने अन्यायकारकरित्या गणेश मंडळांवर दंडात्मक कारवाई करू नये,असे म्हणत या वेळी काळे यांनी अप्रत्यक्षपणे शहरातील खड्ड्यांच्या दूर्दशेकडे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी यांचे लक्ष वेधले.
त्याचप्रमाणे गणेश मंडळांकडून मनपाच्या वतीने दर वर्षी डिपॉझिट घेतले जाते. मात्र मागील अनेक वर्षांपासून घेतलेले डिपॉझिट मंडळांना परत करण्यात आलेले नाही. सध्या कोरोना स्थितीमुळे वर्गणीसाठी अनेक अडचणी कार्यकर्त्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे यावर्षी मनपाने डिपॉझिट घेऊ नये अशी मागणी या वेळी काँग्रेसच्यावतीने काळे यांनी केली.
📌 जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बैठकीला किरण काळे यांच्या उपस्थितीने चर्चेचा विषय : गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, तसेच डीवायएसपी, पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती.
या बैठकीला आयटी पार्क प्रकरणावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहत गणेश मंडळांच्या अडचणी मांडल्या.
काळे यांच्यावर भारतीय दंड संहिता ३५४ प्रमाणे विनयभंग यासारखा गंभीर गुन्हा दाखल असताना देखील ते थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या व पोलीस विभागाच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने सभागृहात कुजबूज सुरू होती. काँग्रेसने जाहीर पत्रकार परिषदेमध्ये घडलेल्या घटनेची फुटेजची सीडी वाजवत सदर गुन्हा खोटा असल्याचे म्हटले होते.
बैठकीतील उपस्थितीबाबत किरण काळे यांना विचारले असता ते म्हणाले की, कर नाही त्याला डर कशाला. त्यामुळे कुठेही पळ काढण्याचे कारणच नाही. मी गुन्हा केलेलाच नाही.
त्यामुळे मी पोलीस कारवाईला सामोरे जायला तयार आहे हे मी वारंवार सांगितले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांसह पोलिसांची उपस्थिती असणाऱ्या या बैठकीत काळे यांच्यावर कोणतीही अटकेची कारवाई न होता काळे बैठकीला आले
देखील आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या समस्या मांडून गेले देखील. यामुळे पोलिसांना देखील विनयभंगाच्या गुन्ह्यातील खोटेपणा लक्षात आला आहे की काय, म्हणूनच काळे यांना अटक होत नाही अशी कुजबुज उपस्थितांमध्ये सुरू होती.