हमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- आम्ही आजपासूनच जाहीर करतोय. आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत. त्यामुळे आम्ही आमची तयारी सुरू केली आहे.
मित्रपक्षांना देखील आमचा संदेश आहे की तुम्हीही तयारी सुरू करा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यावर काँग्रेस ठाम असल्याचं दिसून येत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर राज्यात भविष्यात महाविकासआघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र दिसतील की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे.
सत्तेमध्ये आणि आगामी निवडणुकांविषयीच्या विधानांमध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच असतात, यासंदर्भात विचारणा केली असता नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचं आमचं धोरण जाहीर केलं आहे. समजा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असं सांगितलं, तर ते पाठित खंजीर खुपसल्यासारखं होईल.
त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार”, असं पटोले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी आगामी निवडणुका एकत्रच लढणार असल्याचे संकेत दिले होते. “हे सरकार टिकेल आणि पाच वर्ष काम करेल.
नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.
शरद पवारांनी केलेल्या या विधानावर भाजपा खासदार असलेले नारायण राणे यांनी खोचक टोला लगावला होता. “शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो.
ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. जरी शरद पवार तसं म्हणाले असले, तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत”, असं राणे म्हणाले होते