अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्र मंच बॅनरखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीवर अधिक भाष्य करण्यास नकार देत, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ही राजकारणावर चर्चेची वेळ नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
सध्या माझे देशातील कोरोना परिस्थितीवर लक्ष केंद्रित असून ही परिस्थिती चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे.
कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलण्याकरिता सरकारला बाध्य करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
त्यामुळे मी राजकारणावर चर्चा करून या मुद्यावरून मला भटकायचे नाही, असे राहुल म्हणाले. एका डिजिटल पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राजकारणावर चर्चा करण्याची वेळ आणि स्थान वेगळे आहे. वेळ आल्यावर मी त्यावर बोलेन, अशी सूचक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँग्रेसला आमंत्रित करण्यात आले होते.