काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोदींच्या पुतळ्याची उपहासात्मक आरती करत केले आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.

देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत, असा आरोप नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केला आहे.

यावेळी काँग्रेसने मोदी सरकारला खोटारडे संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याची उपहासात्मकरित्या पंचारती ओवाळत केंद्र सरकारचा निषेध करत तीव्र निदर्शने केली. त्यावेळी काळे बोलत होते.

ओबीसी आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हणत शहर काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या आदेशावरून दिल्लीगेटला तीव्र आंदोलन काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले.

आज शहरात भाजपच्या वतीने खा. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सक्कर चौकामध्ये राज्य सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसे काल भाजपच्या वतीने घोषित करण्यात आले होते. या आंदोलनाच्या विरोधात काँग्रेसने देखील आंदोलन करण्याची घोषणा केली.

भाजपच्या सक्कर चौकातील आंदोलना नंतर काँग्रेसच्या वतीने दिल्लीगेटला किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत तीव्र आंदोलन केले. यामुळे शहरात भाजप आणि काँग्रेसच्या परस्पर विरोधी आंदोलनाची चर्चा दिवसभर सुरू होती.

किरण काळे म्हणाले की, केंद्र सरकारच्या ओबीसी जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात आम्ही आंदोलन करत जनतेसमोर सत्य मांडण्याचे काम केले आहे.

आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे.

देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली.

पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहेत.

ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे, असा घणाघाती आरोप यावेळी किरण काळे यांनी केला. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा,

उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, काँग्रेस नेते फारुक शेख, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख,

इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, विद्यार्थी नगर तालुकाध्यक्ष सुजित जगताप, शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद, सचिव प्रशांत वाघ, माजी नगरसेविका जरीना पठाण, शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड,

सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, उषाताई भगत, कल्पना खंडागळे, सेवादल काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, ऋतिक लद्दे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने, आसाराम पालवे, राहुल गांधी विचार मंचचे सागर ईरमल, सचिव ॲड. सुरेश सोरटे,

सहसचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत ठोंबरे, शरीफ सय्यद, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मोसिम शेख, इम्रान बागवान, अजय मिसाळ, विशाल घोलप, अक्षय पाचरणे आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24