राज्यामार्गांवरील खड्ड्यात वृक्षारोपण करत बांधकाम अधिकाऱ्यांचा निषेध

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्हा आणि खड्डे यांचे समीकरण हे अनेक काळापासून सुरूच आहे. आणि यातच आता दिवसेंदिवस भर पडत आहे. रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे, मात्र यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाला काहीएक रस नसल्याचे दिसून येत आहे.

असाच काहीसा प्रकार तिसगाव मध्ये घडला आहे. तिसगाव- शेवगाव- पैठण राज्यमार्गावर चितळी (ता. पाथर्डी) येथील वळणावर खड्ड्यांमुळे काही दिवसांपासून दररोजच अपघात घडत आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने गावकुसाच्या थांब्याजवळ ढवळेवाडी येथील कडूबाई सोनाजी वाळके या मोटारसायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या.

गुरुवारी ग्रामस्थांत याचे पडसाद उमटले. अपघात घडविणाऱ्या या प्रमुख राज्यामार्गांवरील खड्ड्यात त्यांनी वृक्षारोपण केले. बांधकाम अधिकाऱ्यांचा निषेध केला. ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आमटे, ज्येष्ठ ग्रामस्थ विनायक ताठे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

रस्त्याच्या मधोमध वृक्षारोपण मोहीम अचानकपणे दिसल्याने एसटीसह इतरही प्रवासी वाहने थांबली. त्यांनीही निषेध आंदोलनाला समर्थन दिले.

खड्ड्यांमुळे अपघात घडत असल्याने ग्रामस्थांचा रोष वाढत आहे. किमान मुरमाने तरी खड्डे भरा. दुरुस्तीचा निधी जातो तरी कुठे, असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला आहे.

Ahmednagarlive24 Office